कोंबडीचे एक छोटे पिलू
फार फार आजारी
नाजूक चिवचिव त्याची
केवीलवाणी भासणारी
मरणासन्न अवस्थेतते
निपचित पडून रहायचे
चाहूल आमची लागली की
किलकिल्या डोळ्यानी पहायचे
खाऊ पिऊ घातले
उपचारही खूप केले
औषध पाणी झाल्याने
एक दिवस तरतरीत ते झाले
खुराड्या पासून उंबर्यापर्यंतचा
त्याचा आम्ही उत्साह पाहीला
मला अन् माझ्या आईला
खूप आनंद झाला
हळूच मग मारून उडी
उंबर्यावर ते चढून बसले
कौतुकाने त्याला पाहता
आमचेही मग भान हरले
इतक्यात कुठून अचानक
काळी करडी एक घार आली
इवल्याशा त्या पिलाला ती
पंजात धरून निघून गेली
कसला आजार कसले उपचार
अखेर काळाची सरशी झाली
केविलवाणी एक चिवचिव
आकाशात विरून गेली
केविलवाणी एक चिवचिव
आकाशात विरून गेली
No comments:
Post a Comment